पिंपरी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांचं युध्द राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना हे पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी १२८ पैकी १२५ नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपच्या १२५ जागा आल्या, तर मी कायमचे राजकारण सोडेन. नगरसेवकांना पक्षात घेताना मतदान यंत्रामध्ये (ईव्हीएम मशीन) दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपकडून सांगितले जाते, असा गंभीर आरोप बहल यांनी केला आहे. बहल यांच्या या आरोपामुळे आता राजकारण तापण्याल्याचं दिसून येत आहे. याबाबत एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, परवा चार-पाच दिवसांपूर्वी ते आलं होतं, फार कोणी चालवलं नाही, अजित पवार स्वतः म्हणाले आमच्या लोकांना सांगितलं गेलं की, आमच्याकडे या आमच्या पक्षात या.. म्हणजे भाजपामध्ये या.. अडीच अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये भरलेले आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा असंही राज ठाकरे म्हणालेत.., तर सत्तेमधीलच एक भाग जो आता वेगळा होऊन महानगरपालिका निवडणूक लढवत आहे, इतका जबाबदार माणूस.. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की, भाजपने मशीन मध्ये अडीच अडीच हजार मते भरलेली आहेत म्हणजे आम्ही काय समजायचं सांगा. या सगळ्यांमध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही. ही फेअर इलेक्शन नाहीयेत, इतकंच फक्त आम्हाला सांगायचं आहे, असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
योगेश बहल काय म्हणाले होते?
ईव्हीएम मशीन सेट केल्यात का? तर ते त्यांनाच माहीत, जर भाजप १२५ जागा निवडून आल्या तर कायमच राजकारण सोडून देईल,१०० जागा मिळवणं पण अवघड आहे फोडाफोडीच्या राजकारणात ते लोकांना सांगत आहेत, ईव्हीएम मशीनमशीन मध्ये तुम्हाला दोन ते अडीच हजार मतदान आपोआप मिळतील बाकी मदत पण आम्ही करू तुम्ही आमच्याकडे या जी लोक राष्ट्रवादी सोडून गेली स्वतःवर विश्वास नाही की आपण राष्ट्रवादीकडून निवडून येऊ शकत नाही अजितदादा सारख्या चांगले नेत्याला सोडून जाऊन ते काय साध्य करणार आहेत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटलं होतं.